ससा-ए-बलोच

मनोरंजन

मी मूळचा मराठी पण आज हिंदी चित्रपटाबद्दल बोलणार आहे. लहानपणापासून ऐकत आलात "कोणास ठाऊक कसा, पण सिनेमात गेला ससा” मीच तो! जोधा-अकबरमध्ये ऐश्वर्या होती त्यामुळे माझ्याकडे कुणाचे फारसे लक्षच गेले नाही. मात्र ऐश्वर्याच्या हातून खाताना दाखवलेल्या धिटाईमुळे शाश्वतचे माझ्याकडे लक्ष गेले. मग “धुरंधर: दि रिव्हेंज”मध्ये मला लहान पण महत्त्वाची भूमिका मिळाली होती. 

काम तसं साधं होतं. रणवीरला जेव्हा 'शेर-ए-बलोच’ किताब मिळतो तेव्हा शिराणी त्याला बंदूक आणि ससा (मी!) भेट म्हणून देणार. मला “सशाने हलविले कान” ह्या कामापुरते मानधन मिळणार होते. सुंदर तान वगैरे खालिद आणि शाश्वतच्या मानधनात बसवली होती. पण ऐनवेळी रणवीरच्या चमूतून कुणीतरी कुशंका काढली की सश्याने सिंहाला विहीर दाखवली आणि सिंह मेला; ससा भेट देणं बरं दिसत नाही. झालं! माझ्याऐवजी करडू आलं. इतक्या झपाट्याने तर फक्त फरहान डॉन बदलतो.   

अर्थात माझ्या व्यवस्थापकांना हे पटलं नाही. पण करार केल्याप्रमाणे भूमिका मिळणेही शक्य नव्हते. मग तडजोड म्हणून मला सध्या ससा-ए-बलोच किताब आणि एक गाजर भेट दिले. ते तसलं “खरगोश” किताब नाही, दोस्ता! ससा; ससा-ए-बलोच हा किताब आहे!! याशिवाय धुरंधर ३ मध्ये भूमिका नक्की देणार म्हणून कराराची मुदत वाढवली. 

तर विषयांतर आवरून मूळ मुद्द्याकडे वळू**.** शेर-ए-बलोच बलोच लोकांचे प्रतिनिधीत्व करतो, मी मूळचा मराठी असल्याने मराठी लोकांच्या वतीने विविध मराठी व्यावसायिकांकडे धुरंधर विषयक काही मागण्या मांडणार आहे.                      

मागण्या 
मागणी क्रमांक १ (अ): ही मागणी 'जियो’ निर्मात्यापुढे - हम प्यार करनेवाले आणि तम्मा तम्मा लोगे ऐकवायचं पण सिनेमात माधुरी दिक्षित दाखवायची नाही. असं नाही चालायचं! तेव्हा धुरंधर ३ मध्ये रणवीर-माधुरीला 'हाय रे हाय तेरा घुंघटा’सारख्या एखाद्या सुश्राव्य पण सादरीकरणात गंडलेल्या गाण्यावर थिरकायची संधी द्या. दोघे त्याचे सोनं करतील!! त्यात रेबल गाण्यासाठी आली तर सोन्यावर टाकणखार उर्फ सुहागा. चोली, घागरा नंतर माधुरीचा घुंघटा हवाच!!! माधुरी-राकेश बेदी हे सुद्धा एखादं गाणे चांगलं सादर करू शकतील उदा: ब्राऊन गर्ल इन दि रिंग.. चि. झायन यालीना जसकीरतसिंग रांगी याचे भारतीय कागदपत्रे (अमुक कार्ड, तमुक प्रमाणपत्र) इ. काढायला आजोबा जातील तर तिथे एखादी ब्राऊनच गर्ल लागेल हो. येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे.      

मागणी क्रमांक १ (ब): ही मागणी पण 'जियो’निर्मात्यापुढे - जसं ‘चित्रीकरणात प्राण्यांना इजा झाली नाही’ इ सूचना सुरुवातीला दाखवतात, तसंच ‘चित्रीकरणात कोणतेही इंधन जाळले नाही, सर्व जाळपोळ तंत्रज्ञानाद्वारे दाखवली आहे’ हे धुरंधर ३ मध्ये नक्की नमूद करावे. (अजूनही शक्य असल्यास धुरंधर १ व २ मध्येही दाखवावे) एका व्यक्तीस मारण्यासाठी सहा सिलींडर वापरणे, इंधनाच्या टाकीत अर्जुन रामपाल बुडवून नंतर ते इंधन पेटवणे हे हल्ली जनमानसात वेदना उत्पन्न करू शकते. चहात बिस्कीट बुडवतो आणि खातो तसं अर्जुन रामपाल बुडवून, बाहेर काढून नंतर जाळता नसता का आला? शक्य तर खलनायकास मारण्यासाठीही अपारंपरिक ऊर्जा जसे सौर ऊर्जेचा वापर करावा. 

मागणी क्रमांक २: ही मागणी हमझा नामसाधर्म्य बाळगणाऱ्या यात्राकंपनी पुढे - दिलवाले दुलहनिया ले जायेंगे नंतर लोक त्या त्या जागांवर युरोप पर्यटनास जाऊ लागले. तर आता झेंडू-स्ट्रॉबेरी इ. “आमची माती, आमची माणसे” छाप पर्यटन विसरा आणि कृपया धुरंधर पर्यटन यात्रा काढा. कराचीतील डॉल्फिन मॉल, कासिम किला, गुल प्लाझा, लयारी चिल चौक, मार्गला हिल्स, इ बद्दल जनसामान्यात फार उत्सुकता आहे. 'सश्या, तिथे जाणे सुरक्षित नाही’ इ इ सांगू नका. 'मुमकीन है’ लक्षात ठेवा नि तयारीला लागा. (अगदी खरी लयारी नाही तर लेह, थायलंड मधल खोटं बलुचिस्तान, खोटी लयारी,  इ इ तर दाखवा. नाही म्हणता? बस्स, यही मार खा जाती है इंडिया!)

मागणी क्रमांक ३: ही शेवटची मागणी बीबीसी मराठी पुढे - धुरंधर मधील बंदूका आणि इतर हत्यारे हा अत्यन्त क्लिष्ट विषय आहे. साखळीला बांधलेला जळता लोहगोल याला काही शास्त्रीय नाव आहे का? का येणारा करोना काळ सूचित करण्यासाठी ते सुपीक डिटेलिंग होतं? संजय दत्त त्याच्या प्रवेशाच्या प्रसंगात कच्छच्या रणात दोन वेगळ्या बंदूका वापरतो, जवळ असलेली व्यक्ती मारण्यासाठी एक आणि लांब धावणारी व्यक्ती मारण्यासाठी दुसरी. प्रोग्रेसिव्ह/बायफोकल चष्मा असतो तशी दोन्ही कामासाठी वापरता येणारी एकच बायफोकल बंदूक नसते काय? बडे साहब साठी वापरण्यात आलेले रसायन चुकून संपर्कात आले तर वैद्यकीय इलाज होऊ शकतो का? एकूणात ह्या सगळ्या बद्दल एक ‘सोपी गोष्ट’ हवी.              

मागण्या संपल्या, आता निरोप घेतो. पुन्हा कधी भेट? धुरंधर ३ आल्यावर... तोवर ससा-ए-बलोचला विसरू नका!   
(कालच एप्रिल १ निमित्त पोस्ट करायचं होतं, पण इतरांचे फटाके संपेपर्यँत थांबावं लागतं. 🙂एप्रिल १ म्हणल्यावर लोकांना खोटं वाटेल पण रणवीर आणि सशाचे फूटेज कुठेतरी आहे. कुणाला सापडले तर जरूर पोस्ट करा.) 

Posted Apr 2, 2026, 10:45 PM UTC

04
Loading comments…